जळगाव महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील लिपिक व त्याचा साथीदार लाच घेताना रंगेहात
लिपिक चांदेकऱ्यांची चांदी होण्याआधीच लाचखोरीचा डाव उधळला!
जळगाव दि.19 : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावच्या पथकाने आज महानगरपालिकेतील लिपिक आनंद जनार्दन चांदेकर (वय 37) व शहर समन्वयक राजेश रमण पाटील (वय 35) यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
तक्रारदार यांची करसल्लागार संस्था असून त्यांनी एका संस्थेच्या वतीने नव्या बसस्थानकावरील वातानुकुलीत सार्वजनिक शौचालय पे अँड युज तत्वावर चालविण्यासाठी टेंडर भरले होते. या प्रक्रियेत ३५ हजार रुपयांची अनामत रक्कम भरली होती. परंतु टेंडर मंजूर न झाल्याने ती रक्कम परत मिळावी म्हणून अर्ज दाखल केला होता.
याबाबत लिपिक चांदेकर यांनी अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केली होती. आज (दि. 19 ऑगस्ट) सापळा कारवाई दरम्यान आरोपी चांदेकर यांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर त्यांना व सहकारी आरोपी राजेश पाटील यांना जेरबंद करण्यात आले.
या कारवाईत पर्यवेक्षण अधिकारी श्री. योगेश ठाकूर (पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. जळगाव) तसेच तपास अधिकारी श्री. हेमंत नागरे (पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.