महानगरपालिकेत धक्कादायक प्रकार – सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांनी कालबद्ध पदोन्नतीबाबत दिले रिकाम्या खुर्चीला निवेदन!
जळगाव | प्रतिनिधी ११ तारखेला १२ वाजता महानगरपालिकेच्या मुख्यालयात एक वेगळाच प्रकार घडला. कालबद्ध पदोन्नतीसंदर्भात सेवा निवृत्त कर्मचारी यांनी धनश्री शिंदे यांच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असता, सकाळी ठरलेल्या कार्यालयीन वेळेतही त्या कार्यालयात अनुपस्थित असल्याचे समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा एक प्रतिनिधी मंडळ आज सकाळी ठरलेल्या वेळेनुसार धनश्री शिंदे यांच्या कार्यालयात गेले. मात्र, १२ वाजेपर्यंत संबंधित अधिकारी आपल्या खुर्चीवर उपस्थितच नव्हते. अनेक कर्मचारी व निवृत्त व्यक्ती प्रतीक्षेत बसून राहिले. शेवटी, निवेदन देण्यास वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांनी थेट त्यांच्या रिकाम्या खुर्चीवरच निवेदन ठेवले.
कार्यालयीन वेळेचे बंधन नाही काय? या घटनेमुळे महानगरपालिकेतील शिस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामान्य नागरिक, निवृत्त कर्मचारी व इतर लाभार्थी रोजच्या कामांसाठी ठरलेल्या वेळेत कार्यालयात हजेरी लावतात. परंतु, जबाबदार अधिकारी वेळेवर हजर राहत नसतील, तर कामकाज कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर या प्रकारानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, “जेव्हा आम्ही सेवेत होतो, तेव्हा प्रत्येक मिनिटाचे बंधन पाळावे लागायचे. आज निवृत्तीनंतरही हक्कासाठी कार्यालयात येतो, पण अधिकारी वेळेवर नसतील, तर नागरिकांनी कोणाकडे जायचे?” असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे.
प्रशासनाकडून स्पष्टीकरण अपेक्षित
या प्रकरणी महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही. मात्र, या घटनेनंतर प्रशासनातील शिस्त व उत्तरदायित्वाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पुढे या संदर्भात कारवाई होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.