ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांसाठी मोफत व वातानुकुलीत अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध – जिल्हा परिषदेचा उपक्रम


जळगाव, दि. ८ जून : जळगाव शहरातील विद्यार्थ्यांसाठी आता आधुनिक सोयींनी सुसज्ज अशी मोफत अभ्यासिकेची सुविधा जिल्हा परिषदेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या २० टक्के सेस फंडातून विद्यानिकेतन शाळा, जी.एस. ग्राउंड येथे ही वातानुकुलीत अभ्यासिका उभारण्यात आली असून, ही सुविधा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.

ही अभ्यासिका विद्यार्थ्यांना शांत, सुरक्षित व प्रेरणादायी वातावरणात अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारी ठरणार आहे. येथे ६० विद्यार्थ्यांपर्यंत एकत्र बसण्याची क्षमता असून, २४ तास वीज सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, प्रशस्त बैठक हॉल व वातानुकुलीत व्यवस्था यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून ही अभ्यासिका कार्यान्वित झाली आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना योग्य अभ्यासाची जागा, सोयी-सुविधा व मनास अनुकूल वातावरण मिळाले पाहिजे, याच उद्देशाने जिल्हा परिषदेच्या निधीतून ही अभ्यासिका साकारण्यात आली आहे. या सुविधेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आहे.”

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळा परिसरात ही अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे. अभ्यासासाठी उत्सुक, परीक्षेची तयारी करणारे, स्पर्धा परीक्षांचे स्वप्न पाहणारे आणि अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका उपयुक्त ठरणार आहे.

विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठीचे हे वातावरण केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर मानसिक दृष्ट्याही सकारात्मक ऊर्जा देणारे असेल, असा विश्वास जिल्हा परिषदेने व्यक्त केला आहे.

या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, अभ्यास संस्कृती वृद्धिंगत होण्यास निश्चितच हातभार लागेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button