डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त शिरसोली प्र.न. येथे ग्राम स्वच्छता अभियान राबवले.
जळगाव, दि. १२ एप्रिल २०२५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय सप्ताहाच्या निमित्ताने जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
या स्वच्छता अभियानामध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावेळी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय जळगाव येथील कर्मचारी श्री. जितेंद्र धनगर यांनी उपस्थित नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व विशद करतानाच ग्रामस्वच्छतेसाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमावेळी समाजकल्याण निरीक्षक श्री. एस.एस. महाजन, श्री. एस.एस. क्षत्रिय, श्री. अरुण वाणी, श्री. विशाल वसतकर, श्री. दिनेश जोहरे यांची उपस्थिती होती. तसेच शिरसोली प्र.न. गावचे सरपंच श्री. हिलाल मल्हारी भिल, उपसरपंच श्रीमती द्वारकाबाई तुकाराम बोबडे आणि पोलीस पाटील श्री. श्रीकृष्ण बारी हे पदाधिकारीही कार्यक्रमात सहभागी झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जितेंद्र धनगर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. अर्जुन गायकवाड यांनी केले.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्वच्छ भारत अभियानास हातभार लावण्यासाठी अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.