डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त महिला मेळावा, संविधान जागर व ‘मार्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात संपन्न.
जळगाव, दि. 12 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून आज दि. 12 एप्रिल 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जळगाव येथे महिला मेळावा, संविधान जागर व्याख्यान व ‘स्टॅण्ड अप इंडिया मार्जिन मनी’ या योजनेंवरील विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल ठरले.
या कार्यक्रमाला अग्रणी बँकेचे प्रबंधक श्री. प्रणव झा, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, दूरदृष्य प्रणाली द्वारे जिल्हा माहिती अधिकारी श्री. युवराज पाटील उपस्थितीत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांच्या सशक्तीकरणासाठी केलेले अमूल्य कार्य अत्यंत प्रभावी शैलीत मांडले. “महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केवळ प्रयत्नच केले नाहीत तर त्या अनुषंगाने धोरणात्मक बदल घडवून आणले. हिंदू कोड बिल हा स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने टाकलेला ऐतिहासिक निर्णय होता,” असे त्यांनी सांगितले. महिलांचे हक्क, त्यांचा आत्मसन्मान आणि सामाजिक स्थान यासाठी डॉ. आंबेडकर यांनी रात्रंदिवस झटले, याची प्रचीती त्यांच्या विचारांमधून मिळते, असेही श्री. पाटील यांनी नमूद केले. “एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते,” या बाबासाहेबांच्या विचारांचे उदाहरण देत त्यांनी आजच्या काळातील त्याची उपयुक्तता जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी आपल्या मनोगत अधोरेखित केली.
कार्यक्रमात संविधान जागर या विशेष सत्रात श्रीमती वैशाली पाटील, गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, जळगाव यांनी उपस्थितांना संविधान निर्मितीची पार्श्वभूमी, अनुच्छेद, मूलभूत हक्क व कर्तव्ये यावर सखोल मार्गदर्शन केले. नागरिक म्हणून प्रत्येकाने संविधानाच्या मुल्यांचा स्वीकार करून त्यानुसार वागणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट केले.
यानंतर स्टॅण्ड अप इंडिया योजनेवरील कार्यशाळेत अग्रणी बँकेचे प्रबंधक श्री. प्रणव झा यांनी महिलांसाठी असलेल्या ‘मार्जिन मनी’ योजनेची सविस्तर माहिती दिली. या योजनेच्या माध्यमातून महिला उद्योजकांना मिळणाऱ्या अर्थसहाय्याचे स्वरूप, अर्जाची प्रक्रिया, पात्रता निकष आणि बँकेची भूमिका यावर त्यांनी समर्पक मार्गदर्शन केले. या योजनांचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन श्री. जितेंद्र धनगर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, जळगाव यांनी केले.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील महिला प्रतिनिधी, विद्यार्थिनी, सामाजिक कार्यकर्त्या व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.