मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात तालुकास्तरावर अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूल प्रथम
जळगाव दि.१२ प्रतिनिधी – शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत खासगी संस्था गटामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत तालुकास्तरावर अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल ला प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील पारतोषिक वितरण समारंभ जिल्हा नियोजन भवन येथे पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते हा पुरस्काराचे वितरण झाले. अनुभूती स्कूलच्या प्राचार्य रश्मी लाहोटी, जनसंपर्क अधिकारी रूपाली वाघ, मनोज दाडकर यांच्यासह सर्व शिक्षिका, शिक्षकांनी हा पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी व्यासपीठावर शहराचे आमदार सुरेश भोळे, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, गट शिक्षणाधिकारी सरला पाटील, शा पो आ अधीक्षक विजय पवार, प्रशासन अधिकारी खलिल शेख, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिंचोले, नरेंद्र सपकाळे, ज्ञानेश्वर सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेतील पारितोषिक वितरणानंतर तालुकास्तरीय व्हिडीओ निर्मिती स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यात जळगाव तालुक्यातील २१ शिक्षकांचा समावेश होता.
विकास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी चावडी वाचन, पालक सभेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास कसा साधता येईल, यावर भाष्य केले. त्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती सुद्धा त्यांनी दिली.
डॉ. अनिल झोपे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. शाळांचा विकास खऱ्या अर्थाने केव्हा होईल जेव्हा विद्यार्थी हे समाज उपयुक्त कामे करतील. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असे उपक्रम आनंदाचा स्त्रोत ठरू पाहत आहेत त्याचा सुयोग्य उपयोग करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यातून समाजोपयोगी पिढीची निर्मिती होऊ शकेल.
मातृभाषेतून संस्कारक्षम पिढी घडते – पालकमंत्री
अध्यक्षीय मनोगत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. समाजामध्ये निकोप सुंदर वातावरण निर्माण करण्याचे काम शाळा करतात. त्यातही मराठी शाळा खूप मोलाच्या आहेत. कारण मातृभाषेतील शिक्षणातून संस्काराक्षम पिढी घडते. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा कितीही गाजावाजा असला तरी आयएस, आयपीएस अधिकारी हे मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले जास्त प्रमाणात दिसतात. ग्रामीण तळागाळातील विद्यार्थी यात असतो. खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी ज्याप्रमाणे रीघ लागते त्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लागावी, यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. शिक्षकांचा ड्रेस कोड असावा यासाठी गुलाबराव पाटील यांनी ग्रामीण मतदार संघातील शिक्षक बंधू-भगिनींसाठी ड्रेस देणार असल्याची घोषणा केली.
विभागीय स्तरावर विजयी झाल्याने जि.प.शाळा पिलखेडा ता. जळगाव, माध्यमिक शाळा करंज ता. जळगाव, तर जळगाव तालुकास्तरावर प्रथम जि. प. शाळा विटनेर,द्वितीय जि. प. शाळा जळगाव खु, तृतीय जि प शाळा तरसोद आणि खासगी संस्था गटातील जळगाव तालुकास्तरावर प्रथम अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल, द्वितीय ब. गो. शानबाग माध्यमिक विद्यालय, तृतीय सार्वजनिक विद्यालय आसोदा यांचासुद्धा पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
गट शिक्षणाधिकारी सरला पाटील यांनी प्रास्ताविक केले. अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले. सुशील पवार यांनी सूत्रसंचालन केले.आभार प्रदर्शन विजय पवार यांनी केले.शिक्षण विभाग गट साधन केंद्र कर्मचारी व सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.