जळगाव मनपा नाव बदल प्रस्तावावर, तांबापूर रहिवाशांचा पुढाकार, पटेल गल्लीचे नाव डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम नगर करण्याची मागणी
जळगाव प्रतिनिधी : महानगरपालिकेकडून शहरातील अनेक गल्ली आणि मोहल्ल्यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मनपाने यासाठी नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर तांबापूर वॉर्ड क्र. १४ मधील पटेल गल्लीच्या रहिवाशांनी आज महानगरपालिकेत जाऊन आपल्या हरकती व सूचना सादर केल्या आणि गल्लीचे नाव डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम नगर करण्याची मागणी केली.
मनपाच्या प्रस्तावानुसार पटेल गल्लीचे नाव शिव पार्वती नगर ठेवण्याचे सांगितले होते. मात्र, पटेल गल्लीमध्ये बहुसंख्य मुस्लिम समाज राहत असल्याने, तेथील रहिवाशांनी भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने गल्लीचे नाव करण्याची मागणी केली आहे.
रहिवाशांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, डॉ. कलाम यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे आणि त्यांचे नाव नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या नावाने गल्लीचे नाव ठेवणे आमच्यासाठी अभिमानास्पद बाब असेल.
तांबापूर, पटेल गल्लीचे रहिवासी म्हणाले, “डॉ. अब्दुल कलाम हे केवळ मुस्लिम समाजाचे नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्तानसाठी एकतेचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावाने गल्लीचे नाव ठेवणे आमच्या मोहल्ल्याचा सन्मान वाढवेल.”
हे निवेदन महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता योगेश बोरोले* यांच्या हस्ते सादर करण्यात आले. या निवेदनावर खालील रहिवाश्यांनी स्वाक्षऱ्या केल्या:
तांबापूर फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पटेल,
वसीम बागवान, जावेद बागवान, शरफोद्दीन पटेल, रझाक पटेल, मकसूद भाई, शेख मूसा, वाहिद बागवान, आसिफ कुलकर्णी, मुश्ताक पटेल, शेख इरफान, सुफियान शेख, मुजम्मिल शेख, इब्राहिम शेख, शेख ताजुद्दीन, अनवर सय्यद.
रहिवाश्यांना आशा आहे की मनपा प्रशासन त्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घेईल.