जळगाव तालुक्यातील रामदेववाडीत मौखिक आरोग्याविषयी जनजागृती
रामदेववाडीत मौखिक आरोग्याविषयी जनजागृती
जळगाव दि.२० : तालुक्यातील रामदेववाडी येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयल आणि इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. प्राथमिक शाळा रामदेववाडी तांडा येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत मौखिक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. यात 120 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्याविषयी जागरूक करण्यासाठी रोटरी रॉयलचे अध्यक्षा डॉ. वर्षा रंगलानी यांनी विद्यार्थ्यांना दातांची काळजी कशी घ्यावी, ब्रश कसा करावा आणि दातांच्या आरोग्यासाठी पोषक आहार कसा असावा या संदर्भात मार्गदर्शन केले. ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत सांगितले. डॉ. नितीन विसपूते यांनी व्यसनांचे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. तंबाखू, गुटखा, सुपारी यांसारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. डॉ. बिंदू छाबडा यांनी विद्यार्थ्यांना हाताधुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. रोटरी क्लब रॉयल यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना ब्रश आणि बिस्कीट वाटप केले. डॉ. जयदिपसिंग छाबडा, नितीन मंधान, पिंकी मंधान, डॉ. स्नेहल जाधव, डॉ. निशा तलरेजा, आणि सिमा मुलानी यांनी दंत चिकित्सक शिबिरासाठी सेवा दिली. ज्यांना दंतचिकित्सक विषयी समस्या होत्या, त्यांना पुढील उपचारासाठी टोकन देण्यात आले आहे. गांधी रिसर्च फाउंडेशनचे स्वयंसेवक विक्रम अस्वार हे मौखीक आरोग्याच्या दृष्टाने समस्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत माहिती पोहचविणार आहे. प्रशांत सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. जि.प. शाळेच्या शिक्षिका रत्नप्रभा वाणी, कल्पना सपकाळे, हर्षा तायडे, पुनम बागुल यांनी शिबिराच्या व्यवस्थापनासाठी परिश्रम घेतले.