हिंदू महासभा समविचारी पक्षांसह स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मैदानात
राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश भोगले यांची घोषणा
प्रतिनिधी: मुंबई महानगरपालिका निवडणुका जाणीवपूर्वक लांबवून भाजप सत्ता ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हिंदू महासभेने केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश भोगले यांनी सांगितले की, पक्ष समविचारी संघटनांसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे.
भोगले म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकारण दिशाहीन झाले असून सर्व प्रस्थापित पक्षांनी केवळ वैयक्तिक स्वार्थ आणि मोठ्या अर्थकारणासाठी राजकारण केले आहे. मराठी अस्मिता, शिक्षण, नागरी सुविधा, महिला सुरक्षा, रोजगार, वीज बिलांवर नियंत्रण यांसारख्या मुद्द्यांवर ठोस धोरणांची गरज आहे.
मुंबईसह राज्यातील नगर, महानगर, नगरपंचायतींमध्ये भयमुक्त वातावरण, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी हिंदू महासभा कटिबद्ध राहील, असे त्यांनी सांगितले. लवकरच पक्षाचे वचननामा जाहीर होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्ष अधिवचन दत्तात्रय सणस, उपाध्यक्ष अॅड. गोविंद तिवारी, प्रमुख कार्यवाह महेश सावंत पटेल, हरीश शेलार, राजु तोरसकर, सौ. तिलोत्तमा खानविलकर आदी उपस्थित होते.