सेवाकर्मी प्लस उपक्रमात जळगावच्या सीईओ मिनल करनवाल यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी जळगाव दि. २८ मार्च 2026 : राज्य शासनाच्या “सेवाकर्मी प्लस” उपक्रमात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मंत्री आशिष शेलार, तसेच पोलिस महासंचालक डॉ. सदानंद दाते यांची उपस्थिती होती.
मिनल करनवाल यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा परिषदेत शासकीय योजना प्रभावीपणे राबविणे, कामकाजात पारदर्शकता ठेवणे आणि नागरिकांना चांगल्या सेवा देण्याचे काम करण्यात आले. या कामाची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
या पुरस्कारामुळे जळगाव जिल्ह्याच्या कामगिरीला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढे अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.
