जळगावात ११ मे रोजी कोळी समाजाचा मोफत सामूहिक विवाह सोहळा ; कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे आयोजन.
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजातील विवाहेच्छुक उपवर-वधूंसाठी कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही मोफत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा ११ मे २०२६ रोजी जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
यासंदर्भात प्रतिष्ठानची नुकतीच बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जळगावचे माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे होते, तर कोळी मंडळ, चोपडा येथील संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मागील तीन वर्षांपासून प्रतिष्ठानतर्फे मे महिन्यात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात असून आतापर्यंत पन्नासहून अधिक वधू-वरांचे विवाह मोफत लावण्यात आले आहेत.
दानशूर व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडतो. विवाह सोहळ्यात सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शासकीय व निमशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. वधू-वरांना लग्नाचे पोशाख, बूट-चप्पल तसेच संसारोपयोगी वस्तू भेट दिल्या जातात. याशिवाय एकत्रित वरात, भव्य शोभायात्रा, स्टेज, मंडप, भोजन व इतर आवश्यक सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातात.
विवाह नोंदणीसाठी वधू-वरांचे लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आणि दोन्ही कुटुंबांचे संमतीपत्र आवश्यक असून नोंदणी ३० एप्रिल २०२६ पर्यंत संस्थेच्या श्री शनि मंदिरासमोरील कार्यालयात केली जाणार आहे. गरजू कोळी समाज बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी कोळी, उपाध्यक्ष संजय बाविस्कर, सचिव अनिल कोळी, ज्येष्ठ सल्लागार गोकुळ सूर्यवंशी, संघटक आनंद सपकाळे, सहसचिव अक्षय सोनवणे, खजिनदार सुधाकर बाविस्कर, सहखजिनदार दीपक कोळी, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्यासह पदाधिकारी विशेष प्रयत्न करत आहेत.