शिक्षणाचा नवा आदर्श : ९५% मुस्लिम विद्यार्थी असलेल्या मराठी शाळेत ‘राजभाषा गौरव’ उत्साहात
जळगाव | प्रतिनिधी : मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने जळगाव महानगरपालिका संचालित मराठी मुलांची शाळा क्रमांक ३२ येथे विशेष आणि स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी भाषेचा अभिमान आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने शिक्षक व विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘महाराष्ट्र गीताने’ उत्साहपूर्ण वातावरणात झाली. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मनसे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पारंपरिक फेटे बांधून सन्मानित करण्यात आले. मराठी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या फेट्यांमुळे शालेय परिसरात मांगल्यपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करून त्यांच्या आनंदात भर घालण्यात आली.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शाळा क्रमांक ३२ मधील सुमारे ९५ टक्के विद्यार्थी मुस्लिम समाजातील असून त्यांची मातृभाषा हिंदी असली तरी ते अत्यंत उत्साहाने आणि अभिमानाने मराठीचे शिक्षण घेत आहेत. मराठी ही केवळ राजभाषा नसून संवाद आणि संस्कृतीची भाषा आहे, याचे जिवंत उदाहरण या विद्यार्थ्यांनी घालून दिले. मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचे मराठीप्रती असलेले प्रेम उपस्थितांसाठी कौतुकाचा विषय ठरले.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी सांगितले की, मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे. विशेषतः अमराठी पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनी मराठी स्वीकारणे ही अभिमानाची बाब असून अशा विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन करणे आवश्यक आहे.
तसेच आगामी काळात महानगरपालिका अंतर्गत सर्व मराठी शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मनसेतर्फे विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक संदीप बांगर यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक श्रीकृष्ण बाविस्कर, श्रीमती मीनाक्षी बदर, तुषार चौधरी आणि संदीप रोकडे उपस्थित होते.
यावेळी मनसेचे महानगराध्यक्ष किरण तळले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, विभाग अध्यक्ष आशुतोष जाधव, खुशाल ठाकूर, दीपक राठोड, विकास पाथरे, ऋषिकेश मेंगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीकृष्ण मेंगडे यांनी केले.
या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शहरात या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.