जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेहरूण तलावाला “गुरू गोरक्षनाथ सागर” नाव द्या; – ॲड. गजानन जाधव यांचे प्रशासनाला निवेदन

ऐतिहासिक मेहरूण तलावाचा धार्मिक वारसा जपण्यासाठी मागणी


जळगाव प्रतिनिधी : मौजे मेहरूण येथील ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेल्या मेहरूण तलावाचे “गुरू गोरक्षनाथ सागर” असे नामकरण करण्यात यावे तसेच तलावात सांडपाणी सोडण्यास तात्काळ प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणी ॲड. गजानन जाधव यांनी प्रशासनाकडे विनंती अर्जाद्वारे केली आहे. हा अर्ज जळगाव महानगरपालिका आयुक्त, जळगाव जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

अर्जात नमूद केल्याप्रमाणे, मौजे मेहरूण येथील मेहरूण तलाव हा तलाव १२ व्या शतकात गुरू गोरखनाथ आणि त्यांच्या शेकडो शिष्यांनी खोदल्याचा ऐतिहासिक उल्लेख “गिरणाई, जळगाव नगरपालिका शताब्दी ग्रंथ” या अधिकृत पुस्तकात आढळतो. त्यामुळे हा तलाव केवळ जलस्रोत नसून नाथपंथीय आणि हिंदू धर्मीयांसाठी श्रद्धास्थान व धार्मिक तीर्थक्षेत्र आहे.

मेहरूण तलावात गणेश व देवीच्या मूर्तींचे विधीवत विसर्जन केले जाते. मात्र, परिसरातील अनियंत्रित बांधकामे आणि योग्य सांडपाणी व्यवस्थेचा अभाव यामुळे तलावात सांडपाणी व घाण सोडली जात असल्याचा गंभीर आरोप अर्जात करण्यात आला आहे. यामुळे तलावाची जैवविविधता धोक्यात येत असून धार्मिक वारशालाही धोका निर्माण झाला आहे, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच आगामी धार्मिक पर्वाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे जतन व संवर्धन करणे आवश्यक असल्याचे नमूद करत तलावाचे मूळ ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचे “गुरू गोरक्षनाथ सागर” असे नामकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या संदर्भात प्रशासनाने चौकशी करून तलावाचे संरक्षण, सांडपाणी रोखण्यासाठी उपाययोजना आणि नामकरणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, तसेच अर्जदाराला चौकशीदरम्यान लेखी सूचना देऊन दस्तऐवज सादर करण्याची संधी द्यावी, अशीही विनंती अर्जात करण्यात आली आहे.

नाथपंथीय समाज आणि भाविकांमध्ये या मागणीला महत्त्व प्राप्त झाले असून प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button