वादळी पावसात आंबेडकर स्मारकाचे नुकसान; हरीविठ्ठलनगर नागरिकांचे महापौरांना निवेदन, मजबूत आरसीसी बांधकामाची मागणी
जळगाव प्रतिनिधी : हरिविठ्ठलनगर, बाजारपेठ परिसरातील भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला दिनांक ११ जून २०२५ रोजी रात्री आलेल्या जोरदार वादळ-वाऱ्याचा फटका बसून मोठे नुकसान झाले आहे. स्मारकावरील पत्र्याचे शेड उडून गेल्याने स्मारक सध्या उघड्यावर आले असून भविष्यात पुतळ्याची विटंबना किंवा अधिक हानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता मजबूत व टिकाऊ स्वरूपाचे नव्याने आरसीसी बांधकाम करून स्मारक उभारण्यात यावे, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात हरिविठ्ठलनगर परिसरातील नागरिकांनी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांना निवेदन सादर केले. संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. स्मारकाचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या वेळी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे तसेच फुले-शाहू-आंबेडकर महापुरुष सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश झिने, विद्या झनके, शोभा इंगळे, प्रमिला इंगळे, चंद्रमणी सोनवणे, पूजा इंगळे, कांताबाई झिने, शोभा पाटोळे, प्रशांत इंगळे, आकाश तायडे, आकाश सपकाळे, छाया इंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.