Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळगावात ‘मराठा प्रिमियर लीग पर्व-१’चे , आज होणार उद्घाटन; क्रीडा, समाजसंघटन आणि ऐतिहासिक ठेव्याचा अनोखा संगम


जळगाव प्रतिनिधी : मराठाक स्पोर्ट्स फाऊंडेशन, जळगाव संचलित मराठा प्रिमियर लीग पर्व-१ स्पर्धेचे आयोजन दि. 12/02/2026 ते 22/02/2026 या कालावधीत सागर पार्क, जळगाव येथे करण्यात आले आहे. क्रीडाप्रेमींसाठी ही स्पर्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार असून यावर्षीही उत्साहात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

या पर्वाचे मुख्य प्रायोजकत्व योगराज कन्स्ट्रक्शनचे संचालक श्री. विनोद सोनवणे (मुक्ताईनगर) यांनी स्वीकारले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे स्पर्धेचे नियोजन अधिक भव्य आणि नियोजित पद्धतीने करण्यात आले आहे. यंदा स्पर्धेत 36 पुरुष आणि 6 महिला असे एकूण 42 संघ सहभागी झाले असून सुमारे 550 हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. महिला संघांच्या वाढत्या सहभागामुळे स्पर्धेची व्याप्ती अधिक व्यापक होत असल्याचे चित्र आहे.

या स्पर्धेचा उद्देश केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नसून समाजसंघटन, युवकांना व्यवसायाभिमुख दिशा देणे आणि रोजगारनिर्मितीच्या संधी निर्माण करणे हा आहे. तरुणांनी क्रीडेमधून शिस्त, नेतृत्वगुण आणि संघभावना आत्मसात करत समाजहिताचे कार्य करावे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.

याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून फाऊंडेशनमार्फत रुग्णवाहिका आणि वैद्यकीय साहित्य नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात येते. या सेवेला नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेता यावर्षीच्या पर्वादरम्यान ‘शववाहिकेचे लोकार्पण’ करण्यात येणार आहे. त्यामुळे गरजू कुटुंबांना संकटकाळात मोठा आधार मिळणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती वेगळ्या आणि ऐतिहासिक पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई हरजीराजे महाडीक तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे जावई शंकराजी महाडीक यांचे वंशज श्री. कृष्णाराजे महाडीक हे त्यांच्या कुटुंबाकडील ऐतिहासिक आणि दुर्मिळ ठेवा जळगावकरांच्या दर्शनासाठी उपलब्ध करून देणार आहेत. तसेच स्वराज्याचे निष्ठावान सरदार श्रीमंत कान्होजी जेधे व बाजी सर्जेराव जेधे यांचे 14 वे वंशज श्री. रणधीर जेधे हे देखील ऐतिहासिक वस्तूंसह उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे क्रीडा स्पर्धेबरोबरच इतिहासप्रेमींसाठीही हा एक अनोखा अनुभव ठरणार आहे.

क्रीडा, सामाजिक बांधिलकी आणि ऐतिहासिक वारशाचा संगम घडवणारे ‘मराठा प्रिमियर लीग पर्व-१’ हे जळगावच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करणारे ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button