शहरात वाळू बंद असताना डंपर प्रकरणात ३० हजारांची लाच स्वीकारताना तलाठी व मंडळ अधिकारी रंगेहात अटकेत
शासनाच्या नोंदीत वाळू ठेके बंद; तरी शहरात अपार्टमेंट बांधकामांचा वेग कायम
जळगाव : वाळूने भरलेला डंपर पकडून त्यावर कारवाई न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ममुराबाद येथील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात अटक केली. तडजोडीनंतर ३० हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार हे वाळू वाहतूक व्यवसाय करत असून, ४ फेब्रुवारी रोजी रात्री गस्ती दरम्यान आरोपींनी त्यांचा वाळूचा डंपर पकडला होता. डंपर सोडून देण्यासाठी तसेच पुढील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी लोकसेवक सदानंद मुंडे (तलाठी) आणि अभिजित येवले (मंडळ अधिकारी) यांनी सुरुवातीला ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
दरम्यान, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ११ फेब्रुवारी रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून सापळा रचण्यात आला. त्यानुसार बुधवारी ३० हजार रुपये स्वीकारताना दोन्ही आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.
या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.