पोलीस कर्तव्यावर असताना असुरक्षित; कारचा दुचाकीला कट लागल्याचा वाद ; मद्यधुंद दुचाकी वाहक तरुणांकडून वाहतूक पोलिसांशी धक्काबुक्की ! अखेर जिल्हापेठला गुन्हा दाखल..
“क्षणिक मद्य धुंदी, दीर्घ त्रास : क्षणिक संतापाचा फटका : तरुणांनी केलेल्या वादातून वाढला, पालकांचा त्रास”
जळगाव प्रतिनिधी : शहरात आकाशवाणी चौकात रविवारी संध्याकाळी आठ वाजता कारचा दुचाकीला कट लागल्याच्या कारणामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते . यामुळे दोन तरुणांमध्ये वाद सुरू झाला हा वाद पुढे वाहतूक कोंडीत आणि अखेर वाहतूक पोलिसांशी हुज्जतीत परिवर्तित झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश दिलीप शरमळे (वय २२, रा. गजानन महाराज नगर, रामेश्वर कॉलनी) व शाईदास भगवान राठोड (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी) हे दोघे युवक आकाशवाणी सर्कल रस्त्यावर आपापल्या वाहनांसह जात असताना कारचा मोटारसायकलला कट लागल्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. वाद वाढत गेल्याने दोघांनीही रस्त्यावरच वाहने आडवी लावली, त्यामुळे काही वेळातच त्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
रस्त्यावर वाढलेली गर्दी आणि वाहतूक ठप्प झाल्याची दिसताच कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार दिपक तुळशीराम बनसोडे (वय ५५) हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन्ही तरुणांना शांत राहण्यास सांगून मोटारसायकल व कार बाजूला घेण्याच्या सूचना दिल्या. मात्र दोघेही तरुण दारूच्या नशेत असल्याने त्यांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत मोठ्या आवाजात आरडाओरड सुरू केली.यावेळी मद्यधुंद तरुणांनी पोलीस हवालदार बनसोडे व त्यांचे सहकारी यांच्या सोबत हुज्जत घालून धक्काबुक्की केली. त्यामुळे रस्त्यावर गोंधळ वाढला वाहतूक पोलिस कर्तव्य बजावताना शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.
या प्रकरणी वाहतूक शाखेचे पो.हे.कॉ. दिपक बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा रजि. नं. 27/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 131, 132, 3(5), मोटार वाहन कायदा कलम 185 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 112 व 117 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
23 ऑक्टो.2024 रोजी अशाच स्वरूपाची एक गंभीर घटना जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात भरदिवसा घडली होती. या घटनेत वाहतूक शाखेतील महिला पोलीस कर्मचारी सोनाली सोनवणे या कर्तव्यावर असताना, एका महिलेने दुचाकी वाहनाने त्यांच्या अंगावर धडक देऊन अरेरावी केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी सीना ध्रुव ठाकूर (रा. गणपती नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, संबंधित प्रकरण अद्याप न्यायालयीन कामकाजाच्या टप्प्यावर पोहोचलेले नसून, केस अद्याप बोर्डावर आलेली नसल्याची माहिती मिळाली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सेवेसाठी पोलीस यंत्रणा चोवीस तास तत्पर असते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अनेक अडचणींना सामोरे जात कर्तव्य बजावत असतात. मात्र काही नागरिकांकडून पोलिसांशी हुज्जत घालणे, वाद घालणे किंवा नियमांचे उल्लंघन करणे असे प्रकार घडताना दिसतात. अशा वर्तनामुळे केवळ पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण होत नाही, तर समाजातील शिस्त आणि विश्वासालाही तडा जातो. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून जबाबदार वर्तन करणे ही काळाची गरज आहे.
अशा प्रकारच्या वर्तनामुळे संबंधित विद्यार्थी किंवा युवक यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यास त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी वाद घातल्याने गुन्हा दाखल होण्याची शक्यता वाढते, आणि पोलीस ठाणे व न्यायालयाचे वारंवार फेरे सुरू होतात. या प्रक्रियेत वेळ, पैसा आणि मानसिक शांतता तीनही गोष्टी खर्ची पडतात. नोकरी व्यवसाय करताना सुद्धा याचा मोठा त्रास होतो याची जाणीव तरुणांना असायला हवी.कायद्याचा आदर करणे हाच सुज्ञपणाचा मार्ग असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते.
चालू घटनेचा पुढील तपास जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख करत असून, आरोपींच्या भूमिकेचा आणि घटनेतील इतर बाबींचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.