गडचिरोली महामॅरेथॉन २०२५-पर्व ३ रे प्रचिती मीडियाच्या यशस्वी नियोजनाची विजयी हॅट्रिक
प्रतिकूल परिस्थितीत इव्हेन्ट ग्रँड सक्सेसफुल केल्याबद्दल जळगावचे सचिन घुगे सन्मानित
जळगाव प्रतिनिधी: गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने , आदिवासी समाजाच्या विकास व सन्मानास्तव २८ डिसेंबर २०२५ रोजी भव्य जिल्हास्तरीय गडचिरोली महा मॅरेथॉन२०२५ -पर्व ३ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एरवी नक्षली कारवायांच्या बातम्यांनी चर्चेत असलेल्या गडचिरोलीने या अभिमानास्पद उपक्रमाद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले .पोलीस दलातर्फे झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला . जिल्हाभरातील दुर्गम अतिदुर्गम भागातील समाजाच्या सर्वच स्तरातून आबालवृद्ध अशा सुमारे १४ हजार धावपटूंनी आपला सहभाग नोंदविला . उपक्रमाच्या या अभूतपूर्व यशात जळगावातील प्रसिद्ध जाहिरात संस्था व मॅरेथॉन व्यवस्थापनाचा मोठा अनुभव असलेल्या प्रचिती मीडियाचा ‘ सिंहाचा वाटा ‘आहे. या भव्य मॅरेथॉन स्पर्धेच्या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी प्रचिती मीडिया यांच्याकडे सोपविण्यात आली होती . जळगाव ते गडचिरोली हे प्रचंड अंतर असतांनाही प्रचिती मीडियाने हे आव्हान लीलया पेलले. स्पर्धकांना द्यावयाचे बिब्स , मेडल्स , सर्टिफिकेट्स , मॅरेथॉन किट, ट्रॉफीज यासारख्या सगळ्याच बाबी अतिशय उच्चतम दर्जाच्या व अचूक वेळेत प्रचितीने उपलब्ध करून दिल्यात . स्पर्धेचे मैदानातील व संपूर्ण शहरातील सर्व प्रकारचे डिझाइन्स , कट आउट्स , प्रिंटिंग संपूर्ण गडचिरोली वासियांचे लक्ष वेधून घेत होते . ऐनवेळी उद्भवलेल्या स्थानिक तांत्रिक अडचणींमुळे प्रतिकूल परिस्थितीत, अतिशय आव्हानात्मक असलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेच्या नियोजनात प्रचिती मीडियाचे संचालक सचिन घुगे व त्यांच्या टीमने स्वतःला झोकून दिले होते. गेले अनेक दिवस व रात्र प्रचिती मीडियाचे एकच मिशन होते ते म्हणजे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील महामॅरेथॉन स्पर्धेचे हे तिसरे पर्व ऐतिहासिकरित्या संपन्न करून, नियोजनातील विजयाची हॅट्रिक करणे आणि प्रचितीने ते करून दाखविले.स्पर्धा अतिशय प्रभावीपणे संपन्न झाली. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी या मॅरेथॉनला शुभेच्छा दिल्याचे सांगत, राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी या मॅरेथॉनच्या उत्कृष्ट आयोजनाची भरभरून स्तुती करत, या मॅरेथॉनला भविष्यात राजाश्रयही देण्यात येईल असे सांगितले. आणि नियोजनातल्या याच महत्वपूर्ण योगदानाबद्दल प्रचिती मीडिया जळगावचे संचालक सचिन घुगे यांचा राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते भव्य -दिव्य वातावरणात व्यासपीठावर सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अपर पोलीस महासंचालक छोरिंग दोरजे ,नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महासंचालक संदीप पाटील ,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा , आमदार धर्मरावबाबा आत्राम ,आमदार डॉ. मिलिंद नरोटे ,उपमहानिरीक्षक अंकित गोयल , गडचिरोली पोलिस अधीक्षकश्री. नीलोत्पल सर (IPS), केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक अजय शर्मा, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे , गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे ,लॉयडस मेटल्स &एनर्जीचे एम.डी. बालसुब्रमण्यम प्रभाकरन ,अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मॅरेथॉन आयोजनाचा असलेला गडचिरोली पोलिसांचा उद्देश्य, प्रचिती मीडियाच्या काटेकोर नियोजनाने संपूर्णपणे सफल झाला हे निश्चित. गडचिरोली महामॅरेथॉन २०२५—पर्व ३ चे , प्रचिती मीडियाने यशस्वी नियोजन करून विजयी हॅट्रिक करत, प्रतिकूल परिस्थितीत इव्हेन्ट ग्रँड सक्सेसफुल केल्याबद्दल अनेक मान्यवर, प्रचिती मीडियाचे सचिन घुगे व टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा देत आहेत.