खडके हॉस्पिटलचा बायो-मेडिकल कचरा उघड्यावर ! मनपाच्या आरोग्य विभागाने कारवाई करत दिला २ हजारांचा दंड
वैद्यकीय शिक्षण असूनही कायद्याकडे दुर्लक्ष?
जळगाव प्रतिनिधी: डॉक्टरांना समाजातील सर्वाधिक शिक्षित आणि जबाबदार घटक मानले जातात. मात्र जळगावातील खडके हॉस्पिटलच्या बायो-मेडिकल कचरा व्यवस्थापनाने हा समज प्रश्नांकित केला आहे. रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच नियम पायदळी तुडवत असतील, तर अशा डॉक्टरांना ‘शिक्षित’ म्हणायचे की ‘नियमांपासून अशिक्षित’, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
जळगाव शहरात स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर ठरू शकणारी बाब मंगळवार, दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी उघडकीस आली. शिरसोली रोडवरील श्री कृष्णा लॉन्सच्या पुढे, भास्कर मार्केट परिसरात असलेल्या खडके हॉस्पिटलकडून बायो-मेडिकल वेस्टसह मिश्रित कचरा उघड्यावर टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
रुग्णालयांमधून निर्माण होणारा बायो-मेडिकल कचरा हा अत्यंत धोकादायक असून, त्याची विल्हेवाट ठरावीक नियमांनुसारच लावणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष करून कचरा सार्वजनिक ठिकाणी फेकण्यात आल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या गंभीर प्रकाराची दखल घेत महानगरपालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री. कुणाल बारसे यांनी तत्काळ कारवाई करत खडके हॉस्पिटलवर 2 हजार रुपयांची दंडात्मक कार्यवाही केली. संबंधित रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अनिल खडके यांना याबाबत सूचना देण्यात आल्या.
एकीकडे शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असताना, दुसरीकडे जबाबदार मानल्या जाणाऱ्या वैद्यकीय संस्थांकडून अशा प्रकारची बेपर्वाई होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. बायो-मेडिकल कचऱ्याच्या निष्काळजी व्यवस्थापनामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका वाढतो, मात्र बायोमेडिकल कचऱ्यासाठी शहरात दोन स्वतंत्र वाहन उपलब्ध आहे तरी, याची जाणीव खडके हॉस्पिटलला नसावी का?
प्रशासनाने अशा प्रकारांवर कठोर कारवाई सुरू ठेवावी, तसेच रुग्णालयांनीही सामाजिक जबाबदारी ओळखून नियमांचे काटेकोर पालन करावे, हीच अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.