एक्सझुबेरेंट 2025”मध्ये साकारला शिक्षण, कौशल्य व संस्कारांचा सेतू
जळगाव : बी.यू.एन रायसोनी इंग्लिश मीडियम स्कुलचे वार्षिक स्नेह संमेलन ‘एक्सझुबेरेंट’ हा कार्यक्रम दि. २४ रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात पार पडला. या कार्यक्रमात नाट्य व समूह नृत्यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीमधील मूल्यांची जाणीवकरून देत आधुनिक समाजातील बदलांवर चिंतन मांडण्यात आले. सर्जनशीलता, संस्कृती आणि संकल्पनांचा संगम दिसून आला. या कार्यक्रमात ३६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटीका, रोबोटीक्स,सूत्रसंचाल अशा विविध गोष्टींमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थितांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी यांच्यासह संचालक व शिक्षक पालक संघ सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसंगी वृध्दाश्रमावरील नाटीका व छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारीत सादरीकरणाने प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा राहिला होता. त्याच प्रमाणे विविध गितांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यातील वेशभूषांचे प्रदर्शन पहायला मिळाले. रोबोटीक्सच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टीकोण वाढीस लागत असल्याचे पालकांनी अनुभवले. दरम्यान, महिला व मुलींनी स्व-संरक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिक दहावीची विद्यार्थीनी कावेरी नितीन सुरवाडकर हिने करून दाखविले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या जन्म जात कौशल्यांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट’ या उपक्रमाचे महत्व प्राचार्य मनोज शिरोळ यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी व इतर मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट विद्यार्थ्यांना व कलाकारांना गौरविण्यात आले.