ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात ‘विशेष वाहन चेकिंग मोहिमे’त ११०६ वाहनांवर कारवाई; १३.७१ लाखांचा दंड वसूल


जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात वाढते रस्ते अपघात रोखणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे तसेच गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण जिल्ह्यात ‘विशेष वाहन चेकिंग मोहीम’ राबविण्यात आली. या मोहिमेत ११०६ वाहनांवर कारवाई करत तब्बल १३ लाख ७१ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व वाहतूक शाखांना कडक नाकाबंदी करून सखोल तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्व पोलीस ठाणे व वाहतूक शाखांनी स्वतंत्र पथके तयार करून विविध ठिकाणी वाहन तपासणी केली.

या मोहिमेत विशेषतः विना नंबर प्लेट असलेली वाहने तसेच अल्पवयीन वाहन चालकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. मोहिमेदरम्यान नंबर प्लेट नसलेल्या अथवा फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या ४६३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तसेच, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत वाहन चालवणाऱ्या १०७ अल्पवयीन चालकांवर कारवाई करून ४ लाख ४ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. यावेळी पोलिसांतर्फे पालकांना आपल्या अल्पवयीन मुलांकडे वाहन देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय, इतर मोटार वाहन कायद्यांतर्गत (MV Act) नियमभंग करणाऱ्या ५३६ वाहनांवर कारवाई करून ५ लाख २१ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.या विशेष मोहिमेत जळगाव शहर वाहतूक शाखा, भुसावळ शहर, चाळीसगाव शहर वाहतूक शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली.

जिल्हा पोलीस दलाकडून पुढील काळातही अशाच प्रकारच्या कडक मोहिमा राबविण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button