अयोध्या–प्रयागराज महामार्गावर भीषण अपघात; जळगावातील पिंप्राळा येथील एका महिलेचा मृत्यू, 11 जण जखमी !
भाविकांसाठी प्रशासनाची तात्काळ मदत सुरू
जळगाव, प्रतिनिधी दि. 6 : उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे अयोध्या–प्रयागराज महामार्गावर शनिवारी पहाटे ४ वाजता जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला वेगवान ट्रेलरने दिलेल्या धडकेमुळे भीषण अपघात झाला. अयोध्या येथे दर्शन करून परतीच्या प्रवासात असलेल्या या बसमध्ये एकूण 44 भाविक होते. या दुर्घटनेत पिंप्राळा येथील छोटीबाई शरद पाटील (वय 55) या महिलेचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. घटनानंतर जखमींवर सुलतानपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असून सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले असून जखमी व सुरक्षित भाविकांसाठी रेल्वे तिकिटांची व्यवस्था करण्यात आली आहे. मृत महिलेचे पार्थिव नातेवाईकांसह परत आणण्यासाठी प्रशासनाकडून ॲम्बुलन्सची सोय करण्यात आली असून ती आज दुपारी जळगावकडे रवाना झाली आहे. या संपूर्ण घटनेवर जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सतत लक्ष ठेवून असून सुलतानपूर स्थानिक प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधला जात आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.