शहराचा साफसफाई कराराचा तिसरा महिना पूर्ण — बीव्हीजी कंपनीला आता दंडाची चेतावणी
तीन महिन्यांचा कालावधी संपूनही काम सुरळीत नसेल, तर बीव्हीजी कंपनीचा करारही वॉटरग्रेस प्रमाणे इतिहासात जमा होणार का?
जळगाव : शहराच्या स्वच्छतेचा बागुलबुवा बनलेल्या कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी मनपाने तीन महिन्यांपूर्वी बीव्हीजी कंपनीला दिली. पाच वर्षांपूर्वी वॉटर ग्रेस कंपनीच्या निष्क्रिय कारभारावर नागरिकांनी केलेल्या तीव्र तक्रारीनंतर ही नवीन निविदा देण्यात आली आहे.मात्र, तीन महिने उलटूनही परिस्थितीत लक्षणीय बदल नाही. कचरा संकलन, घंटागाड्या, व ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थेत अडथळे तसेच नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. दिलेली तीन महिन्यांची तयारी मुदत ३० नोव्हेंबरला संपत असून, डिसेंबरपासून मनपा कठोर भूमिकेत येणार आहे.
मनपाने आधीच कंपनीवर किरकोळ दंड आकारला असून ट्रॅक्टरमध्ये माती व रेती आढळल्याने कंपनीला ५० ते ६० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, आता काम सुरळीत नसल्यास मोठ्या प्रमाणात दंड आकारण्याची चेतावणी मनपाने दिली आहे.
मनपाच्या नियमांनुसार नागरिकांनी स्वच्छतेसंबंधी तक्रार केल्यास १२ तासांत निपटारा करणे बीव्हीजीस बंधनकारक आहे. अन्यथा दंड टाळता येणार नाही. त्याशिवाय ओला व सुका कचरा वेगळा न घेतल्यास थेट कंपनीवर कारवाई होणार आहे. पुढील काळात नागरिकांनाही दंड आकारण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
सध्या बीव्हीजी कंपनीकडे:२२ ट्रॅक्टर ,८८ घंटागाड्या आहे मनपा व कंपनी मिळून १,३०० कर्मचारी अशी मोठी यंत्रणा काम करत आहे.तरीही शहरातील अनेक भागात घंटागाड्या वेळेवर न येणे, रस्त्यावर कचरा ढिगाऱ्यात दिसणे, आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अनियमित कामामुळे नागरिक त्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.
बुधवारी झालेल्या पुनरावलोकन बैठकीत कंपनीचा कामकाज मनपा अधिकाऱ्यांनी तपासला. बीव्हीजीचे व्यवस्थापक श्रीकांत हंगे यांना मनपाच्या अधिकाऱ्यांनी कठोर सूचना दिल्या आहेत.या वेळी मनपाचे आरोग्य अधिकारी उदय पाटील, स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे व इतर अधिकारी उपस्थित होते.मनपाचे एकच लक्ष्य — शहराची स्वच्छता रँकिंग सुधारावी.पण केवळ कंपनीवर अवलंबून न राहता नागरिकांनीही भूमिका पार पाडण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.