आगामी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
आगामी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
निवडणूक तयारी आढावा बैठकीत दिले निर्देश
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज घेतला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीतील त्रुटींचा अभ्यास करुन आगामी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देशही दिले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात नाशिक जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन केले होते, त्यावेळी एस. चोकलिंगम् बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, अपर आयुक्त निलेश सागर, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपआयुक्त मंजिरी मनोलकर, सहायक आयुक्त विठ्ठल सोनवणे व नाशिक जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्री.चोक्कलिंगम पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी अचूक होण्यासाठी प्रयत्न करावेत. १८-१९ वर्षातील व स्त्री मतदार वाढीसाठी वशेष प्रयत्न करावेत. तसेच आगामी विधानसभा निवडणूक कमीत कमी खर्चात कशी सक्षमतेने पार पाडता येईल, यासाठी देखील नियोजन करण्यात यावे. तसेच यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी नियमानुसार निवडणुकीची कामे करावीत. मतदार यादी, आवश्यक असलेल्या मतदान साहित्याचा आढावा, लोकसभा निवडणुकीच्या खर्चाचा आढावा व आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक निधीचा आढावा घेण्यात आला. तसेच स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्राचा आढावा घेतला.