“गावगावात येणार विकासाची नवी पहाट – मिनल करनवाल यांनी केल्या जिल्हा परिषदेत पदोन्नती व नियुक्त्या”
जळगाव, दि. 23 सप्टेंबर – जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत विभागातील पदभरती प्रक्रियेत आज समुपदेशन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ४ जणांना ग्रामविकास अधिकारी पदावरून विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली, तर प्रतीक्षा यादीतील ५ जणांची कंत्राटी ग्रामसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या समुपदेशन कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल प्रमुख उपस्थित होत्या. तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) श्री. चंद्रशेखर जगताप व ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बी. यू. आकलाडे यांची उपस्थिती लाभली.
नव्या पदोन्नती व नियुक्त्यांमुळे ग्रामपंचायत विभागातील प्रशासनिक कामकाज अधिक परिणामकारक होणार असून ग्रामीण भागातील विकासात्मक उपक्रमांना आवश्यक ती गती मिळणार आहे. यामुळे ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज सुलभ होऊन नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल.