ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने मुख्यमंत्रींच्या हस्ते गौरव
मुंबई, दि.२९ :राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण कामकाजाचे सादरीकरण केले. पारदर्शक, गतिशील आणि तंत्रज्ञानाधारित सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्यात जळगाव जिल्ह्याने केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले.
या मोहिमेत जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, पोलीस विभाग, मंत्रालयीन विभाग आदी प्रवर्गांतून सर्वाधिक गुण मिळविलेल्या निवडक कार्यालयांना सादरीकरणाची संधी देण्यात आली होती. जिल्हाधिकारी प्रवर्गातून जळगावचे आयुष प्रसाद यांचा गौरव होणे हा जिल्हा प्रशासनासाठी सन्मानाचा क्षण ठरला.
ई-गव्हर्नन्स उपक्रमांतर्गत ‘आपले सरकार पोर्टल’, ई-ऑफिस, ऑनलाईन प्रमाणपत्रे, आपत्ती व्यवस्थापन, संकेतस्थळ अद्ययावतीकरण यांसह लोकाभिमुख सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कामगिरीची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली.
मुख्य सचिव राजेश कुमार यांनी देखील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून लोकाभिमुख काम केल्याचे सांगत कौतुक केले.
जळगाव जिल्हा प्रशासनाच्या या कामगिरीमुळे ई-गव्हर्नन्स क्षेत्रात जळगाव जिल्ह्याची छाप ठळकपणे उमटली आहे.