“माझा फोन वाजला की तुझा कान वाजेल” म्हणणारे राहुल गायकवाड यांची एलसीबीमध्ये धडक एन्ट्री..
लोकल क्राइम ब्रांच पुन्हा वादात! पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांची महिलेचे लैंगिक शोषण प्रकरणात तातडीने बदली, त्यांच्या जागी राहुल गायकवाड यांची तातडीने नियुक्ती
जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एलसीबीचे निरीक्षक संदीप भटू पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने कारवाई करत त्यांची बदली नियंत्रण कक्षात केली आहे. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राहुल बाबासाहेब गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेला नवे नेतृत्व मिळाले आहे.
जिल्ह्यातील सर्वात चर्चेत राहणाऱ्या पदांपैकी एलसीबी निरीक्षकाचे पद नेहमीच गाजत आले आहे. गेल्या वर्षी ३१ मे २०२४ रोजी वरिष्ठ निरीक्षक किसनराव नजनपाटील सेवानिवृत्त झाल्यानंतर बबन आव्हाड यांची नियुक्ती झाली होती. मात्र विधानसभा अधिवेशनात ड्रग्स प्रकरण गाजल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली आणि संदीप पाटील यांची नियुक्ती झाली. आता पुन्हा या पदावर वादाचे सावट आले आहे.
आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी संदीप पाटील यांच्यावर एका महिलेकडून शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप झाल्याचे सभागृहात उघड केले. एवढेच नव्हे, तर या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या घडामोडींमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या महत्त्वाच्या पदावर पुन्हा एकदा चर्चेचे वादळ उठले आहे.