चोपडा तालुक्यातील सत्रासेन ग्रामस्थांचा एल्गार : बेकायदेशीर जप्त केलेले ट्रॅक्टर विनादंड सोडा, अन्यथा धरणे आंदोलन !
प्रतिनिधी चोपडा: तालुक्यातील मौजे सत्रासेन या पेसा क्षेत्रातील ग्रामसभेच्या ठरावानुसार प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी वाळू व मुरूम वाहतूक करणारा ट्रॅक्टर (न्यू महिंद्रा कंपनी – चेसिस नं. 006504668C2DA064) तहसीलदार चोपडा यांनी बेकायदेशीररित्या जप्त केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, २५ मार्च २०२५ रोजी ग्रामसभेत पेसा कायदा १९९६ अंतर्गत नियम ३२(२) प्रमाणे गौण खनिजांचा (वाळू, मुरूम, दगड, गोटे, माती इ.) स्थानिक गरजेसाठी वापर करण्याचा ठराव पारित झाला होता. त्यानुसार घरकुल योजनेंतील लाभार्थ्यांना वाळू पुरविण्यासाठी सदर ट्रॅक्टर वापरले जात होते.
परंतु, चोपडा ग्रामीण पोलीस व महसूल विभागाने ट्रॅक्टर जप्त करून दंडात्मक कार्यवाहीची नोटीस बजावली आहे. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे ग्रामस्थांचे मत असून, ट्रॅक्टर विनादंड सोडण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, या मागणीसाठी दि. २६ ऑगस्ट २०२५ पासून धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या आंदोलनात बापू केशव भिल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक सहभागी होणार आहेत.
ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत ट्रॅक्टर सोडण्यात येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.