केसीई सोसायटीच्या ८१ वर्षांच्या वाटचालीचा भव्य सोहळा
जळगाव प्रतिनिधी : सन १९४४ मध्ये स्थापन झालेली केसीई सोसायटी महाराष्ट्रातील एक नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. गुणवत्तापूर्ण शिक्षण व सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या ध्येयावर गेल्या आठ दशकांपासून संस्था ठाम आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्वांनुसार अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान, कला, वाणिज्य, भारतीय ज्ञान प्रणाली (IKS), भारतीय संगीत, रिफ्लेक्सोलॉजी, निसर्गोपचार व योग विज्ञान अशा विविध शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर व डॉक्टरेट स्तरावरील अभ्यासक्रमांची सुविधा संस्था पुरवित आहे.
हा प्रेरणादायी प्रवास आता ८१ वर्षांचा होत असल्याने दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.४५ वाजता केसीई संस्थेच्या प्रांगणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रथमच केसीई सोसायटीच्या सर्व संस्था मिळून एकाच दिवशी व एकाच वेळेस संस्थेच्या आजवरच्या गौरवशाली वाटचालीचे विविध अंगाने दर्शन घडविणार आहेत. एकूण १७ कार्यक्रमांतून संस्थेची शैक्षणिक व सामाजिक उंची अधोरेखित होणार आहे.
या सोहळ्याला मा. कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी यांची विशेष उपस्थिती लाभणार असून मा. उप कुलगुरु डॉ. एस.टी. इंगळे विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. संस्थेच्या गौरवशाली इतिहासाची झलक दाखवणारी विशेष चित्रफीतही यावेळी प्रदर्शित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. श्री. प्रकाश पाटील भूषवणार आहेत.
सर्वांना या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण आहे.