रोटरीच्या वारसा छायाचित्र स्पर्धेत दैनिक सकाळचे छायाचित्रकार संधिपाल वानखेडे यांच्या फोटोला प्रथम पारितोषिक तर हौशी गटात तुषार मानकर प्रथम.
जळगाव, दि. 22 : रोटरी क्लब जळगाव तर्फे जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आयोजित वारसा फोटो प्रदर्शन स्पर्धेत वृत्तपत्र छायाचित्रकार गटात दैनिक सकाळचे संधीपाल वानखेडे हे प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले, तर तरूण भारतचे सुमित देशमुख व लोकमतचे सचिन पाटील यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर, पब्लिक इमेज कमिटी चेअरमन व प्रोजेक्ट चेअरमन राजेश यावलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार स्मिता वाघ यांनी फोटोग्राफी ही एक कला आहे. ज्यांच्याकडे व्हिजन आहे त्यांनाच ते शक्य होते. वृत्तपत्र छायाचित्रकार प्रचंड धावपळ करून प्रसंगी जीव धोक्यात घालून फोटोग्राफी करीत असतात. त्यांच्या एका छायाचित्रात अग्रलेखाचा सारांश असतो. तंत्रज्ञान बदलले तरी चंद्र-सूर्य असेपर्यंत वृत्तपत्रांना आणि छायाचित्रांना पर्याय नाही असे सांगितले. रोटरी क्लब जळगावने छायाचित्रकारांना स्पर्धेच्या माध्यमातून तर पु.ना.गाडगीळ अँड सन्स यांनी कला दालनाच्या माध्यमातून कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अत्यंत सुंदर छायाचित्रे असलेल्या या वारसा प्रदर्शनाला मी भेट दिली आहे.
खासदार वाघ यांच्या हस्ते हौशी गटातील विजेते छायाचित्रकार प्रथम – तुषार मानकर, द्वितीय – विशाल चौधरी (अमळनेर), तृतीय केतन महाजन आणि उत्तेजनार्थ जे.पी. वानखेडे यांना पारितोषिके देण्यात आले. वृत्तपत्र छायाचित्रकार गटातील उत्तेजनार्थ बक्षीस प्रकाश जगताप यांना प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण आनंद मल्हारा, तुषार बुंदे, प्रमोद घोडके यांनी केले. त्यांच्या वतीने आनंद मल्हारा यांनी छायाचित्रकारांच्या वतीने सुमित देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विजेत्या वृत्तपत्र छायाचित्रकारांसह आबा मकासरे, नितीन सोनवणे, गोकुळ सोनार, मुबारक तडवी, भूषण हंसकर यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
पारितोषकांची घोषणा रोटरी क्लब जळगावचे माजी अध्यक्ष प्रा. पूनम मानूधने, राघवेंद्र काबरा, डॉ. जयंत जहागीरदार, ॲड. प्रवीणचंद्र जंगले, जितेंद्र ढाके, ॲड. सागर चित्रे, माजी सचिव प्रा. शुभदा कुलकर्णी आणि डॉ. मिलिंद वायकोळे यांनी केली. खासदार स्मिता वाघ यांचे स्वागत आदिती कुलकर्णी यांनी केले.
प्रास्ताविक गिरीश कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन राजेश यावलकर यांनी केले. आभार सुभाष अमळनेरकर यांनी मानले.