प्रतिनिधी जळगाव : जळगाव जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री. विनोद शांताराम पाटील (वय ५० वर्षे) यांचे आज शनिवार, दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.
बैलपोळ्याच्या सुट्टीच्या दिवशी शासकीय निवासस्थानी असताना त्यांना अचानक मेंदूत रक्तस्राव (ब्रेन हॅमेरेज) झाला. त्यानंतर त्यांना तातडीने भंगाळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पत्रकारांना जिल्ह्यातील अधिकृत माहिती नेहमीच तत्परतेने उपलब्ध करून देणारे आणि माध्यमांशी सलोख्याचे संबंध ठेवणारे श्री. पाटील यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राला मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या सहज-सोप्या स्वभावामुळे ते माहिती कार्यालय व पत्रकार यांच्यातील महत्त्वाचे दुवा ठरले होते.
आज रविवार दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा येथे त्यांचा अंत्यविधी होणार आहे.