जळगाव महानगरपालिके अंतर्गत शाहू रुग्णालय येथे आयुष्मान भारत चे 31 हजार नागरिकांचे कार्ड दाखल, आशा सेविका घरोघरी जाऊन करताय आयुष्यमान कार्ड वाटप..
प्रतिनिधी जळगाव : गरजू व वंचित कुटुंबांना मोफत आरोग्यसेवा मिळावी यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शाहू रुग्णालयात या योजनेसाठी नागरिकांची नोंदणी करण्यात आली होती. आणि काही नोंदणी आशा सेविका यांनी घरोघरी जाऊन केली होती.
या नोंदणी अंतर्गत 31 हजारांहून अधिक आयुष्मान कार्ड तयार झाले असून, त्यांचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
महापालिकेच्या दवाखाना विभागामार्फत विशेष मोहीम हाती घेतली आहे. आशा वर्कर घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड वाटप करत आहेत. यावेळी त्या नागरिकांना योजनेबाबत सविस्तर माहिती देऊन मोफत उपचारांच्या सुविधांची जाणीव करून देत आहेत.
आयुष्मान कार्ड मिळाल्यानंतर नागरिकांना सरकारी तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयात वर्षाला ₹५ लाखांपर्यंत मोफत उपचार घेता येणार आहेत. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला गंभीर आजार, शस्त्रक्रिया किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज भासल्यास या योजनेचा थेट लाभ घेता येईल.
ज्या नागरिकांना अजूनपर्यंत कार्ड मिळालेले नाही त्यांनी आपल्या परिसरातील आशा वर्करशी संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा उगले यांच्या वतीने करण्यात आले आहे.