दिव्यांग अधिनियम 1995 व शासन दिव्यांग धोरण 2016 ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी दिव्यांग अपंग साधना संघाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन पत्र
जळगाव प्रतिनिधी: दि.16 : दिव्यांग समाजाला भारतीय राज्यघटनेनुसार समान हक्क आणि संधी मिळाव्यात तसेच दिव्यांग अधिनियम 1995 व शासनाच्या दिव्यांग धोरण 2016 ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी दिव्यांग साधना संघ वतीने राज्य सरकारला सविस्तर निवेदन देण्यात आले.
या निवेदनात दिव्यांग समाजाच्या अनेक मूलभूत मागण्या मांडण्यात आल्या असून, संबंधित यंत्रणा आणि अधिकारी मंडळे याबाबत निष्क्रिय असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून मुख्यमंत्री यांनी या समाजाच्या न्याय हक्कांची पूर्तता करावी, अशी विनंती संघटनेने केली आहे.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे: 1. राज्यघटनेच्या तरतुदीनुसार 12 आमदारांच्या मनोनयन प्रक्रियेत दिव्यांग साधना संघाच्या एका सदस्याची नियुक्ती करावी.
2. स्थानिक स्वराज्य संस्था, मंत्रालय, मंडळे, बँका व प्राधिकरणांमध्ये दिव्यांग प्रतिनिधीची नियुक्ती व सहभागीता सुनिश्चित करावी.
3. दिव्यांगांसाठी विविध योजनांमध्ये कर्जमाफी आणि आर्थिक सवलती लागू कराव्यात.
4. स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या निधीतून दिव्यांग प्रतिनिधींची निवड व सहभाग सुनिश्चित केला जावा.
5. जळगाव येथे दिव्यांगांसाठी घरे व रोजगार उपक्रम राबवण्यासाठी संघटनेस 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य द्यावे.
6. दिव्यांग बांधवांसाठी जळगाव शहरात 5 एकर शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी.
7. दिव्यांग अधिनियम 1995 च्या कलम 43 नुसार दिव्यांगांना 7.5 टक्के बाजार दराने शासकीय जमिनी भाडेपट्ट्यावर द्याव्यात.
8. प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी कार्यशाळा, घरकुल, रोजगार निर्मिती केंद्र उभारण्यासाठी 5 एकर शासकीय जमीन विनामूल्य उपलब्ध करून द्यावी.
9. विविध कंपन्यांच्या CSR फंडातून दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी निधी मिळवून देण्याची शिफारस शासनाकडे करावी.
10. संजय गांधी निराधार योजना अंतर्गत दिव्यांगांना नियमित मासिक मानधनासाठी निश्चित तारीख ठरवावी.
11. दिव्यांगांना 4% आरक्षण असलेल्या शासकीय नोकरभरतीत त्वरित भरती करण्यात यावी व सर्व संबंधित संस्थांना याचे पालन करण्याचे निर्देश देण्यात यावेत.
दिव्यांग साधना संघाने राज्य शासनाकडे मागणी केली आहे की, या सर्व मागण्यांवर त्वरित निर्णय घेऊन दिव्यांग बांधवांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा. असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.